Manasi Kulkarni

Manasi Kulkarni

Friday, 12 August 2011

मला खात्री आहे...

   परवाच एक जाहिरात माझ्या पाहण्यात आली. आपल्या देशात जे परदेशी पर्यटक येतात त्यांच्या समोर कचरा करू नये, त्यांची लुबाडणूक करू नये, त्यांच्या कडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळू नयेत. आणि हि जाहिरात हिंदी चित्रपट सृष्टीतील एक मोठा अभिनेता करत होता. हि जाहिरात जो संदेश देत होती तो नक्कीच चांगला होता, पण एवढा प्राथमिक संदेश आपल्याला द्यावा लागतो, याचच वाईट वाटत. आपण आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छता राखावी, रस्त्यात कचरा टाकू नये, चुकीच्या पद्धतीने पैसे कमावू नये, खोट वागू/ बोलू नये.... हे सगळ तर आपण आपल्या पालकांनी लहानपणी सांगितलेल्या गोष्टीमधून ते दुसरी तिसरीतल्या परिसर अभ्यासात शिकलो आहोत... मग आता तीच गोष्ट पटवून का द्यावी लागते. आणि मुळात परदेशी पाहुणे काय म्हणतील? या हि पेक्षा आपला परिसर, देश स्वच्छ असावा,  हि जाणीव प्रत्येक व्यक्तीला का नाही?
   थोडा पुढे जावून विचार करायचा झाला तर अनेक गोष्टी आहेत ज्या आपण पाळतो, पण त्यामागे कारण वेगळी असतात. उदाहरणच द्यायचं झाल तर "सिग्नल!"... आपण "सगळेच" सिग्नल लागला कि थांबतो .. पण जवळ जवळ ८०% लोक सिग्नल तोडत नाहीत याच कारण "ट्राफिक पोलीस असला तर पकडेल" हि भीती त्याच्या मनात असते. पण मुळातच सिग्नल तोडणं चुकीच आहे, त्यामुळे ट्राफिक जॅम होऊ शकत, आपला अंदाज चुकून अपघात होऊ शकतो, ह्याची जाणीवच त्यांना नसते. खूप अशा चुकीच्या गोष्टी आहेत ज्या  आपण करत नाही, पण त्या मागची कारण वेगळी असतात. त्या खरच चुकीच्या आहेत याची जाणीव असतेच असं नाही, तर "पकडले" जाण्याची भीती मनात असते. 
   आपल्या जाणीवा इतक्या निष्क्रिय झाल्यात कि नक्की काय चुकीच आहे? काय बरोबर आहे? हे आपल्याला माहित असूनसुद्धा तसं वागण्यासाठी आपल्यावर बंधनं घालावी लागतात/  कायदे करावे लागतात, तरच आपण तसे वागतो आणि त्याबद्दल जराही खंत वाटत नाही... हि केवढी मोठी शोकांतिका आहे... थोडा विचार करण्याची पद्धत बदलली आणि चांगल्या गोष्टी करण्याची सवयच लावून घेतली तर चांगले बदल घडवून आणावे लागणार नाहीत, तर ते आपोआपच घडतील. चांगल्या गोष्टी इतरांना शिकवण्याची गरजच भासणार नाही. स्वतापासून सुरुवात केली तर ती वणव्याच्या आगीसारखी पसरत जावून पूर्ण देशाचाच कायापालट करून टाकेल... मला खात्री आहे ...

Sunday, 17 July 2011

एक ओळख अशी ही...

परवा काही कामानिमित्त बँकेत गेले होते. जरा घाईतच होते कारण लगेच शूटिंगला जायचं होत. एका ठिकाणी फोर्म भरून देत होते, इतक्यात मागून एक हात खांद्यावर पडला. वळून पाहिलं तर एक साठीतले गृहस्थ माझ्याकडे कुतूहलाने पहात उभे होते.

"काय ग, कधी आलीस?" इति आजोबा.

खर सांगायचं तर सुरुवातीची काही सेकंद " हे आजोबा कोण?" याचा विचार करण्यात गेली. मी याना कुठे भेटली असेन?.... आणि मग आपण कुठून येण्याबद्दल ते विचारात आहेत? या विचारांनी मनात एकदम गोंधळ वाढला...

तेवढ्यात "अग कधी आलीस?" पुन्हा आजोबांनी विचारलं.

एकतर उशीर झाला होता आणि त्यात बँकेत महत्वाच काम ही पूर्ण करायचं होत. मी पटकन त्यांना म्हणाले " आजोबा, मला उशीर होतोय आणि हे महत्याच काम मला पूर्ण करायचं आहे"

त्यानी हि चटकन उत्तर दिल " काही हरकत नाही, तू तुझ काम कर, तो पर्यंत मी माझ पासबुक अपडेट करून घेतो."

मी पुन्हा कामाला लागले, पण हे आजोबा कोण ह्याचा विचार मनात चालूच होता.

काम आटपल आणि मी शूटला जायला निघाले, आजोबा पासबुक अपडेट करून घेत होते. मी बँकेच्या बाहेर पडले. पण न राहून सारखा विचार मनात येत होता कि हे आजोबा कोण आणि ते मला कुठून येण्याबद्दल विचारत आहेत. ह्या विचारातच मी कधी वळले आणि आजोबांसमोर येऊन उभी राहिले हे मलाच कळल नाही. तो पर्यंत आजोबांचं पासबुक अपडेट करून झाल होत.

त्यांनी पुन्हा मला तो प्रश्न विचारला "काय ग, कधी आलीस?.

"आजोबा तुम्ही मी कुठून आल्याबद्दल विचारताय? थोडा संदर्भ द्याल का प्लीज" इति मी.

"अग असं काय करतेस, तू अमेरिकेला गेली होतीस ना, पुढील शिक्षणासाठी... तू  "अमृता" ना कुंकू मालिकेमधली. आणि काय ग, तुमच्या घरी इतके प्रोब्लेम चालू आहेत आणि तू अमेरिकेत काय गेली होतीस? पण बर झाल तू परत आलीस, मी तुला नीट सांगतो की नक्की कोण चुकतंय आणि कुठे प्रोब्लेम होतोय.. किती त्रास देत आहेत त्या बिचार्या जानकीला आणि ती ही कोणतीही गोष्ट नीट मांडूच शकत नाही... अग घरातली माणस नेहमी आनंदात असली पाहिजेत... आणि नरसिःह रावांची मोठी मुलगी म्हणून तुला हे सगळे गैरसमज दूर करायला हवेत" आजोबा मनात दाटून आलेलं बोलत होते.

मी शांतपणे त्याचं ऐकून घेतलं आणि खरच खूप आश्चर्य वाटत होत की आपल्या करमणुकीसाठी असलेल्या मालिकेला स्वताच्या आयुष्याचा भाग बनवणारे आणि मालिकेत घडणारे सुख दुखाचे प्रसंग आपल्याच आयुष्याचा भाग समजणारे प्रेक्षकही आहेत. आजोबाना नीट समजावलं आणि तिथून निघाले.

पण मनात एक विचार सारखा येत होता की "आपण विविध मालिकातून/ चित्रपटातून जे काही करमणुकीसाठी दाखवत असतो ते प्रदर्शित करण्यापूर्वी खूप खबरदारी घेण्याची गरज आहे, खूप विचारमंथन होण्याची गरज आहे आणि हे माध्यम सांभाळून हाताळण्याची गरज आहे."



We all participate in weaving the social fabric; we should therefore all participate in patching the fabric when it develops holes.-Anne C.

Friday, 3 June 2011

बस्स करा आता...

हल्लीच पुन्हा पेट्रोलचे भाव भडकले. थोडी थोडकी नाही तर ५ रुपयांची भाव वाढ झाली, आता लवकरच  डिझेल, LPG / CNG गॅसचे भाव वाढणार. मग पुन्हा रिक्षा आणि टॅक्सी यूनियन वाले आणि त्यांचे नेते संप पुकारणार. सरकार नेहमी प्रमाणे नमत घेणार आणि पुन्हा आपण भाववाढीला सामोरे जाणार.
पण ज्या वेळेस, दिवसात कोणत्याही वेळेस आपल्याला रिक्षा, टॅक्सी मिळत नाही, हे उद्दाम ड्राइवर्स सर्रास "नाही जाणार" असं सांगतात, गॅस संपलाय, रिक्षा बंद आहे, अस सांगून आपल्याच डोळ्यासमोर त्यांना ह्व आहे तिथे, दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जातात. तेव्हा ही नेते मंडळी असतात कुठे.
त्यांना त्यानी केलेल्या कामाचे योग्य पैसे मिळायलाच हवेत, यात दुमत नाही, पण त्यांनीही त्याचं काम प्रामाणिक पणे करायला हवं.
दुसर उदाहरण द्यायचं झाल तर आपले "बेस्ट" बसवाले. सकाळी ऑफिसला जाणारी माणसं, संध्याकाळी दमून भागून घरी येणारी माणसं समोरून धावत येताना दिसत असून सुद्धा आणि बस मध्ये जागा असून सुद्धा सरळ बसचा वेग वाढवून निघून जातात. एकीकडे "बेस्ट" बसचा जास्तीत जास्त वापर करा अशी जाहिरात केली जाते आणि दुसरीकडे मात्र याच्या विरुध्द पद्धतीने वागलं जातंय, हे खरच बरोबर आहे का?
मोठ मोठ्या खाजगी कंपन्या ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देत असताना, ही महत्वाची यंत्रणा वर्षानुवर्षे त्याच पद्धतीने चालू आहे... किती काळ टिकू शकेल हे सगळ.
भविष्यात जर कोणत्यातरी खाजगी कंपनीने टॅक्सी, बस आणि रिक्षा सुरू केली आणि उत्तम सेवा देऊ केली ( मेरू आणि कूल टॅक्सी यांनी आपल्या उत्तम सेवेमुळे आपल अस्तित्व व्यवस्थित सिद्ध केलंय) आणि आपण सगळ्यांनी त्या सेवेचाच वापर सुरू केला, तर ह्या एवढ्या मोठ्या कम्यूनिटीच काय होणार? मग पुन्हा संप, आंदोलंनाना सुरूवात होणार... यात पुन्हा आपलीच गळचेपी... हे सगळ होण्यापेक्षा आताच त्यानी नीट कामाला लागायला नको का? कामगार नेत्यांनी तरी त्याना योग्य ते प्रशिक्षण, मार्गदर्शन करायला नको का? फक्त रिक्षा आणि टॅक्सीचे भाव वाढवण्या इतपत त्यांची भूमिका मर्यादित का?
वेळेत बदल घडवून कामाला सुरुवात केली तर भविष्य उज्ज्वल आहे... नाहीतर...

- मानसी कुलकर्णी.

Friday, 20 May 2011

"आदर्श" म्हणजे काय रे भाऊ!!

काही महिन्यापूर्वी "आदर्श" हा शब्द वाचला/ ऐकला की थोर व्यक्ती, संघटना आणि त्यांची उत्तमोत्तम कामं डोळ्यासमोर यायची. त्यांचे थोर विचार लक्षात यायचे आणि समाजाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आणि समाजाच्या कल्याणासाठी त्यांची धडपड जाणवायची.
याच नावाने एक बिल्डींग मुंबईत बांधली गेली. जो उद्देश ही सोसायटी बनवताना होता तो खरच आदर्श या शब्दाला साजेसा होता. पण पुढे त्याच काय झाल ही लिहिण्यात मी वेळ फुकट घालवणार नाही. ते जग जाहीर आहे आणि रोज वृत्तपत्र चाळली  की ह्या विषयी काही ना काही तरी लिहून येतंच आहे.
                                            हा घोटाळा खरच फार भीषण आहे.

"एक "आदर्श" घोटाळा उघडकीस..." ही 'ब्रेकिंग न्युज" वृत्तपत्र आणि वाहिन्यांवर पाहून खूप वाईट वाटलं. आदर्श हा शब्द या वाक्यातही वापरला जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हत.
माझ्या पर्यंतच्या पिढीला "आदर्श" म्हटलं तर किमान काही थोर व्यक्ती/ संघटना आणि त्यांची कामं तरी आठवतात, पण माझा माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असलेला माझा भाचा किवा त्याची पिढी "आदर्श" म्हटलं की "घोटाळा ना" असं सहज म्हणून जाते. किती हा अपमान या शब्दाचा.

पुढे जाऊन विचार करायचं झाल तर ती इमारत आता पाडून टाका यावर वाद विवाद सुरु आहेत. पण खरच ती इमारत पाडून ह्या ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत, त्याची उत्तरं सापडतील का? तर माझं उत्तर "नाही" असच आहे. म्हणजे जे कोणी भ्रष्ट नेते, अधिकारी किवा सोसायटीतील सदस्य या घोटाळ्यात सामील आहेत त्यांना कडक शासन झालंच पाहिजे, पण ती इमारत पाडून टाकण, हा मार्ग मला तरी योग्य वाटत नाही.

म्हणजे या इमारतीच जे काही बांधकाम कायद्याला वाकवून किवा तोडून झाल आहे, ते नक्कीच तोडलं गेलं पाहिजे, पण जे कायद्यात बसत ते न पाडता त्याचा योग्य तो वापर झाला पाहिजे.
उदाहरणार्थ: हल्ली मराठी शाळांचं प्रमाण कमी झाल आहे, तर एक "आदर्श" मराठी शाळा तिथे उभी राहू शकते. एखाद उत्तम संग्रहालय, लहान मुलांसाठी "वर्कशोप प्लेस" तयार करता येऊ शकते. एखाद अनाथाश्रम किवा वृद्धाश्रम तिथे निर्माण करता येऊ शकेल. कितीतरी उत्तमोत्तम प्रकल्प जागे/ निधी अभावी आकारास येऊ शकत नाही आहेत, तर या इमारतीचा योग्य तो वापर करून ते प्रकल्प सुरु करता येऊ शकतील. आणि हल्ली जो लोकांनी "आदर्श" म्हणजे घोटाळा हा अर्थ काढला आहे, तो सकारात्मक दृष्टीने "आदर्श" बनवता येईल.

आता एवढ तरी करायला हवंच ना!!

- मानसी कुलकर्णी

Wednesday, 27 April 2011

येवा कोकण आपलोच असा!!

मित्र- " ए तू पुढच्या आठवड्यात काय करते आहेस? शुक्रवार, शनिवार, रविवार लागून सुट्टी आली आहे. अजून २ दिवस रजा टाकून कोकणात फिरायला जाउया का?"
सध्या कामातून थोडी विश्रांती मिळाल्यामुळे मीही चटकन होकार दिला. मग कधी निघायचं? कसं जायचं? कुठे कुठे थांबायचं? वगैरे वगैरे ठरवण्यासाठी छोटीशी मिटिंग झाली. मुंबई हून गणपतीपुळे, मग मालवणला जायचं ठरलं. मध्ये एक दिवस मित्राच्या गावीही जायचं ठरलं. सगळा प्लान पेपरवर तयार झाला. गाडी आमचीच असल्यामुळे आणि ती माझा मित्रच चालवणार असल्यामुळे प्रवासाचा त्रास फारच कमी होणार होता.
नाटकांच्या दौऱ्याव्यतिरिक्त कोकणात मी फिरायला अशी पहिल्यांदाच जाणार होते त्यामुळे excitment होती पण मुंबईच्या lifestyle ची सवय झाल्यामुळे आपण तिथे adjust करू शकू की नाही याची काळजीही वाटत होती.
बघता बघता निघायचा दिवस उजाडला. गाडीत Bags कोंबल्या आणि प्रवासाला सुरुवात झाली.गाडीचा वेग वाढू लागला तसं आपण मुंबईच्या गर्दीतून बाहेर पडू लागलो याची जाणीव झाली. खाऊचा साठा तर इतका घेऊन ठेवला होता की पूर्ण ट्रीपची जेवण आणि नाश्ते त्यावर करता येणार होते. त्यामुळे आमचं चरण मध्ये मध्ये चालूच होतं. खादाडी चालू असूनही वडखळ नाक्यावर मिसळ खाण्याचा मोह आवरता आला नाही. भन्नाट टेस्टी होती मिसळ...
छोटी छोटी खेडी जाताना वाटेत लागत होती. मित्र त्या खेड्यांबद्दल त्याला जेवढी माहिती होती ती तो मला मनापासून सांगण्याचा प्रयत्न करत होता. रस्ते वाटले होते तितके वाईट अवस्थेत नव्हते त्यामुळे अंधार पडू लागला होता तरी वळणा वळणाचा तो रस्ता व्यवस्थित दिसत होता. रात्री ९ च्या सुमारास आम्ही आमच्या पहिल्या destination म्हणजे गणपतीपुळ्यात येऊन पोहोचलो. उशीर झाल्यामुळे पटापट सामान रूमवर टाकून जेवायला धावलो. एकंदरीत ट्रीपमध्ये आमच्या खाण्याचा उत्साह दांडगा आहे हे एव्हाना तुमच्या लक्षात आलच असेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता उठून पटापट आवरून गणेश दर्शनासाठी मंदिराकडे जायला निघालो. संकष्टीच्या दिवशी गणपतीच दर्शन होणार होतं, यामुळे आनंद द्विगुणीत झाला होता.सकाळी लवकर गेल्यामुळे फार गर्दी नव्हती. त्यामुळे अगदी छान मनसोक्त दर्शन घेता आलं. नंतर बीचवर गेलो. खरतर मुंबईकरांना बीचच तितकस आकर्षण नसत असं म्हणतात, पण हा बीच इतका सुंदर आणि स्वच्छ आहे कि आम्ही अधाशासारखे त्याचे फोटो काढू लागलो. उंटावरून एक फेरफटका हि मारण्यात आला. जास्त वेळ थांबता आलं नाही कारण वेळ थोडा आणि खूप फिरायचं होत.
मग वैभववाडीला माझ्या आत्याकडे जायला निघालो. पोहोचायला थोडा उशीरच झाला कारण फोटो काढण्यासाठी मध्ये मध्ये गाडी थांबत होती. इथली मंडळी जणू चातक पक्ष्यासारखी आमची वाट पाहत होती. आम्ही पोहोचल्यावर आमचे किती लाड करू आणि किती नको असं झालं होत. मुंबईतली मंडळी इतक्या लांब फार जात नाहीत, त्यामुळे आमचा पाहुणचार काही औरच होता. आम्ही पण लगेच रुळलो. उन्हातून दमून आल्यामुळे लगेच सरबत झाली. मग जरा गप्पा टप्पा झाल्या. संकष्टी असल्यामुळे छान गोडाचं जेवण होत. वाढण्यात आग्रह होता, तो ही तोंड देखल्या नव्हे तर मनापासून. जेवण आटपतायत न आटपतायत तोपर्यंत पुढ्यात दारातल्या केळ्यांचे घड आणि कलिंगड ठेवण्यात आलं. बर आग्रह एवढा की नाही म्हणवेना. मग आत्याने तिची बाग दाखवली.इतकी फळझाड मी एकत्र कधीच पाहिली नव्हती. काजू, पेरू, चिकू, फणस, करवंद, केळी... आणि आंबे तर सहज हाताला लागतील इतक्या खाली लटकत होते. बागेच्या कडेकडेने वेगवेळ्या फुलांची झाडे आणि त्यांची सुंदर अशी रचना केळी होती. तासभर कसा निघून गेला ते कळलच नाही.
मग आमची गाडी मित्राच्या गावाकडे वळली. जाताना एवढी माडाची झाडं, नद्यांचे प्रवाह लागले की इथल्या इमारतींचा आणि दगदगीच्या आयुष्याचा काही काल विसरच पडला. बघता बघता आम्ही मित्राच्या गावाला येऊन पोहोचलो. आपण चित्रात काढतो तशी कोनाच छत असलेली कौलारू घर तिथे होती. एकदम आपण लहानपणी काढलेल्या एखाद्या चित्रात प्रवेश केल्यासारखं वाटत होत. आम्ही तशाच एका घरात शिरलो. ते माझ्या मित्राच्या काकाचं होत. तिथे गेल्यावरही पुन्हा त्याच प्रेमाची आणि आपुलकीची जाणीव झाली हे वेगळ सांगायला नको. गेल्या गेल्या चहा समोर आला. मी चहा घेत नाही हे कळल्यावर लगेच माझ्यासाठी दुध साखर आणण्यात आलं. पूर्ण घर शेणाने सारवल होत, अंगणात झोपाळा होता, माणसांबरोबर मांजरी आणि कोंबड्यांचा ही वावर होता... इतकं प्रसन्न वातावरण होत की खरच ते वातावरण अनुभवायला दरवर्षी मी गावी जायचं मनात पक्क करून टाकलं. मी मुद्दाम स्वयंपाक खोलीत गेले. तिथे बायकांच काम चुलीवर चाललं होत. आपण जसा gas कमी जास्त करतो तशा त्या चुलीतली लाकड कमी जास्त करून, मध्ये मध्ये नळीतून फुंकर मारून आच कमी जास्त करत होत्या. मला खूपच मज्जा येत होती. एक दिवस आम्ही तिथेच राहिलो.
सकाळीच मंडळींचा निरोप घेऊन आम्ही मालवणला जायला निघालो. रस्ता घाटा घाटाचा असल्या कारणाने सगळ्यांचे डोळे रस्त्यावर टिकून होते. एका बाजूला लाल मातीचे डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. आजूबाजूला छान हिरवळ पसरली होती. मला वाटत मुंबईकरांना पालेभाजीच्या पलीकडे फारशी हिरवळ पाहायलाच मिळत नाही. हवेत जरा दमटपणा आल्यावर मालवण जवळ जवळ येत असल्याची जाणीव झाली.
वेळ कमी असल्यामुळे मालवणला पोहोचल्यावर लगेचच गाडी पार्किंगमध्ये लावली आणि किल्ला पहायला पळालो. किल्यातील बांधकाम जून झाल्यामुळे जीर्ण झालं होत. पण जे बांधकाम पाहिलं आणि गाईडने जी माहिती पुरवली त्यातून याच मोठ कौतुक वाटलं. समुद्राच्या मधोमध असलेल्या या किल्यात ३ गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत, शत्रूला न दिसता टेहाळणी करण्याची उत्तम सोय, सहजा सहजी चढता येऊ नये म्हणून केलेली मोठ्या मोठ्या पायऱ्या... पूर्ण इतिहास आठवला. महाराजांना पुन्हा एकदा वंदन करून त्याच समुद्रात स्नोर्क्लिंग करायला निघालो. यात पाण्यात घेऊन जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि वनस्पती दाखवले जातात. आपण बुडू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जाते. इतक्या जवळून वेगवेगळ्या प्रकारचे आणि रंगाचे मासे पहायला मिळतात जर हात पुढे केला तर त्यांना सहज पकडता येईल. खूप खूप धमाल आली. पाण्याखालच एक वेगळ जग पहायला मिळाल.
                  कसे ३ दिवस निघून गेले ते कळलच नाही. परतीच्या वाटेला लागलो, पण थोडा वेळ अजून असायला हवा होता असं सारख सारख वाटत होत.  त्या आठवणी मनात ठेऊन परत निघालो.
                               पण आता जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा कोकणात जाणार हे नक्की....

- मानसी कुलकर्णी.

Tuesday, 12 April 2011

थांबू... थोडा विचार करु... मग बोलू!!!

    रविवारी मैथिलीचा कार्यक्रम होता, ती सूत्र संचालन करणार होती. बऱ्याच विद्वान आणि नामवंत व्यक्ती त्या कार्यक्रमाला येणार होत्या, त्यामुळे मैथिलीची विशेष तयारी सुरु होती. तालिमी जोरात सुरु होत्या. मैथिलीच्या आईलाही कार्यक्रम बघायला जाण्याची प्रचंड इच्छा होती. आणि तिच्या आईची ही इच्छा पूर्ण होणार होती कारण मैथिलीला एक पास मिळणार होता.
    आई कार्यक्रमाला जाणार आहे याची मैथिलीच्या बहिणीला जराही कल्पना नव्हती.
    कार्यक्रम संध्याकाळचा असल्यामुळे आई सकाळपासूनच घाई करत होती, जेवणात आज मैथूची आवडीची बासुंदी पुरी करायचं आईने ठरवलं आणि तयारीलाही लागली. एकदम झकास जेवणाची तयारी झाल्यामुळे मैथूच्या बहिणीने (स्वरांगीने) त्याच दिवशी आपल्या "मित्राला" आईला भेटण्यासाठी घरी बोलावण्याबद्दल आईला विचारलं. पण आईने तत क्षणी तो प्रस्ताव फेटाळला. कारण अर्थातच तिला मैथूसोबत कार्यक्रमाला जायचं होत. ताईनेही काहीही न बोलता तो निर्णय मान्य केला. मैथूलाही आधी आईने आपल्याबरोबर कार्यक्रमाला यायला प्राधान्य दिलं, याचा आनंदच झाला. पण नंतर तिने याचा नीट विचार केला. ताईचा मित्र कशाकरता येणार होता हे मैथूला चांगलंच माहित होतं आणि ताईच्या मनात काय आहे हे ही ती जाणून होती. शिवाय ताई अशा गोष्टी पटकन बोलणार्यातली नव्हती, त्याअर्थी तो प्रस्ताव त्यानेच मांडला असणार हे ही उघडच होतं.
   कधीही पटकन व्यक्त न होणाऱ्या ताईला वाईट तर नक्कीच वाटलं असणार पण तिने तसं अजिबात जाणवू दिलं नाही. शेवटी न रहावून मैथूनेच आईला घरी रहायला सांगितलं. "अगं तो पहिल्यांदा घरी येतोय तर थांब ना" इति मैथिली. तिला असं वाटलं कि आई समजून घेईल... पण झालं उलटंच. मैथू असं का सांगत असेल हे समजून घेण्या ऐवजी आई मैथूलाच रागे भरू लागली. तिला वाटलं की मैथूला आपण तिच्याबरोबर यायला नको आहोत म्हणून ती असं सांगते आहे. तेवढ्यात तिने मैथूला "माझ्या पासवर दुसर कोण येणार आहे का?" असेही विचारलं. आईच्या अशा आरोपवजा बोलण्याचे मैथूला फार वाईट वाटलं. आईच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं हेच तिला कळेना.
   मैथूला आईला गैरसमज झाल्याच वाईट वाटत नव्हत तर वाईट या गोष्टीचं वाटत होत की आपण असं का सांगत असू हे साधं जाणून घेण्याचाही प्रयत्न आईने केला नव्हता. आईने नुसतं कारण जरी विचारलं असतं ना तरी तिला सगळ नीट समजावून सांगता आलं असतं पण तिने तसं न करता "मैथूला आपल्या पासवर दुसऱ्या कोणाला तरी न्यायचं आहे" असा विचार केला. पण तरीही मैथूने पुढाकार घेऊन आईला परिस्थिती नीट समजावून सांगितली. पण त्यामागे "आपण कसे निर्दोष आहोत" हे सिद्ध करणं नव्हत, तर ताईने जो निर्णय घ्यायचं ठरवलं आहे, तो कितपत बरोबर आहे, तो मुलगा कसा आहे, हे बघावं आणि ताईसाठी योग्य तो निर्णय योग्य वेळी घ्यायला मदत करावी, हीच भावना होती.
  कार्यक्रम संपल्यावर मैथिली घरी आली, रात्रीची जेवण सुरु झाली. मैथिलीने नुसता ताईच्या मित्राचा विषय काढला आणि आई भरभरून बोलू लागली. तिला तो खूप आवडला होता. ताईही खूप खूष होती. मैथिली ही आनंदाने सगळ ऐकत होती... पण सकाळी घडलेल्या प्रसंगाबद्दल कुठेतरी तिला वाईट वाटत होतं....

Friday, 1 April 2011

Sachin.. Tussi Great Ho!!

   आपण वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. पण एक थोडा जुना किस्सा सांगते. भारत वि वेस्ट इंडीस सामना चालू होता. माझी मैत्रीण, मैथिली आणि तिची बहीण सगळी कामं आटपून सामना बघायला बसल्या होत्या. भारताने toss जिंकला होता आणि Batting घेतली होती.
   सामना रंगात येऊ लागला होता. तेवढ्यात नेहमी प्रमाणेच आईला काही तरी आठवलं आणि तिने मैथूला भाजी आणि मसाला आणायला पाठवलं. तिला हे सवयीच होतं, त्यामुळे नाही म्हणण्यात अर्थ नव्हता. ती भाजीवाल्याकडे गेली तेव्हा तो transister वर सामन्याची Commentary ऐकत बसला होता. भाजी घेऊन पैसे देत असतानाच सचिन तेंडूलकर बाद झाल्याच दोघांच्या कानावर पडलं.
   "सचिन अब बुढ्ढा हो गया है. अब तो खेलना छोड़ देना चाहिए. सिर्फ २ रन्स बनाए. अब ज़रा नए लोगो को चानस देना चाहिए" इति भाजीवाला.
   आधीच सचिन इतक्या लवकर बाद झाल्यामुळे मैथु थोडी नाराज झाली होती. आणि त्यात भाजीवाल्याचे शब्द कानावर पडल्यावर त्याला खाऊ का गिळू असं झालं होतं. तिने त्याच्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला, तसा तो शांत झाला. त्याला शांत केल्याचा एक बारकासा आनंद तिला झाला होता.
   जरा चिडचिड करतच मैथु घरी आली, पण कुणीच त्याकडे लक्ष दिले नाही, कारण सामना सुरु असताना मध्येच जावं लागल्याचा तो राग आहे असं सगळ्यांना वाटलं. मैथुही नंतर सामना बघायला बसली खरी, पण घडला प्रसंग काही केल्या डोक्यातून जाई ना. राग तेंडूलकर बाद झाल्याचा नव्हता तर जो माणूस त्याच पूर्ण आयुष्य क्रिकेट जगला, फक्त भारतातच नव्हे तर जगभरात ज्याला क्रिकेटचा देव मानला जात, क्रिकेटचे सगळे रेकॉर्ड्स ज्याच्या नावावर आहेत, त्या महात्म्याबद्दल एक दीड दमडीचा भाजीवाला असं बोलूच कसं शकतो याचं तिला वाईट वाटत होत. आपण आज चांगले खेळू शकलो नाही याची खंत त्याला स्वतःला नसेल का? एका सामन्यावरून त्याच्यावर लगेच संशय घेण्याच कारण नाही. सचिन लवकर बाद झाल्यावर वाईट वाटण साहजिकच आहे, पण ते व्यक्त करताना आपण भान ठेवलंच पाहिजे. बसल्या जागी दुसऱ्यावर comment करणं सोपं असतं, पण ते करण्याआधी आपल्याला त्यातलं किती आणि काय कळत याचा विचार नको का करायला?
  या विचारात हरवून गेलेली मैथु भानावर आली तो पर्यंत भारत सामना जिंकला होता. मैथु ठरवून भाजीवाल्याकडे गेली. आता मात्र त्याचा Transister बंद होता आणि तो कामात व्यग्र झाला होता. मैथुने मुद्दाम खोचकपणे त्याला जाऊन सांगितलं " भैया, भारत जिंकला बरं का!!". त्यावर त्याने मान खाली घालूनच उत्तर दिले "चला अच्छा हुआ".... आता मात्र मैथुला त्याची कीव आली...

- मानसी कुलकर्णी

!!टीम इंडियास अंतिम सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!

Thursday, 24 March 2011

!!Shree Ganesha!!

  बी. कॉम झाले आणि पुढे काय करायचं याचा विचार सुरु झाला. अभ्यासात फर्स्ट क्लास कधीच सोडला नव्हता, त्यामुळे पुढे शिक्षण सुरु ठेवायचं की गेली पाच वर्ष जे नाटकाचे धडे गिरवत होते ते चालू ठेवायचं, हे ठरवायचं होत. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती, त्यामुळे नोकरी करण्याचा हि विचार केला होताच... पण आई, ताई च भक्कम माझ्या पाठीशी उभं राहाण, विश्वास सरांनी ठेवलेला पाठीवरचा हात आणि जवळच्या मित्र- मैत्रिणीनी, नातेवाइकानी  वाढवलेला आत्मविश्वास अभिनय क्षेत्रात करीयर करण्याचा निर्णय घेण्यासाठी पुरेसा होता.
  त्या नंतर जोमाने कामाला लागले, विश्वास सरांच्या हाताखाली पाच वर्ष काम केल्यामुळे पुढे या क्षेत्रात पुढे जाण्याची भीती नव्हतीच. मग भेटी गाठी सुरु झाल्या, audition ना जाऊ लागले आणि कामं मिळण्यास सुरुवात झाली.. दिग्गजांच मदत/ मार्गदर्शन मिळत होतच. या क्षेत्रातील Do's आणि Don't  कळायला लागले होते... आणि आता कुठे करियरला सुरुवात झाली आहे, भरपूर काम करायचंय , उत्तमोत्तम भूमिका साकारायच्या आहेत, खूप खूप शिकायचं आहे. असो...
हा ब्लॉग लिहायला सुरुवात करण्याची भूमिका थोडक्यात स्पष्ट करते..
  कामानिमित्त हल्ली खूप ठिकाणी फिरणं होत, वेगवेगळ्या माणसांशी भेटी गाठी होतात, आजूबाजूला वेगवेगळे प्रसंग पहायला/ ऐकायला मिळतात. कधी योग्य तर कधी अयोग्य पद्धतीने ते घडलेले असतात. कधी मनाला पटतात तर कधी चुकीचे वाटतात, काही प्रसंग खूपच अस्वस्थ करतात, तर या घडलेल्या प्रसंगावर माझं मत मांडण्यासाठी मी लिहायचं ठरवलंय. यात लिहिलेले प्रसंग कधी स्पष्टपणे, तर कधी काल्पनिक पात्रांचा आधार घेऊन मांडलेले असतील.
  यात मांडलेले विचार/ प्रसंग प्रत्येक वाचकास पटतीलच असे नाही... असा आग्रहही नाही.... पण माझा एक प्रयत्न मात्र असेल आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर माझे मत मांडण्याचा....!!

- मानसी कुलकर्णी