रविवारी मैथिलीचा कार्यक्रम होता, ती सूत्र संचालन करणार होती. बऱ्याच विद्वान आणि नामवंत व्यक्ती त्या कार्यक्रमाला येणार होत्या, त्यामुळे मैथिलीची विशेष तयारी सुरु होती. तालिमी जोरात सुरु होत्या. मैथिलीच्या आईलाही कार्यक्रम बघायला जाण्याची प्रचंड इच्छा होती. आणि तिच्या आईची ही इच्छा पूर्ण होणार होती कारण मैथिलीला एक पास मिळणार होता.
आई कार्यक्रमाला जाणार आहे याची मैथिलीच्या बहिणीला जराही कल्पना नव्हती.
कार्यक्रम संध्याकाळचा असल्यामुळे आई सकाळपासूनच घाई करत होती, जेवणात आज मैथूची आवडीची बासुंदी पुरी करायचं आईने ठरवलं आणि तयारीलाही लागली. एकदम झकास जेवणाची तयारी झाल्यामुळे मैथूच्या बहिणीने (स्वरांगीने) त्याच दिवशी आपल्या "मित्राला" आईला भेटण्यासाठी घरी बोलावण्याबद्दल आईला विचारलं. पण आईने तत क्षणी तो प्रस्ताव फेटाळला. कारण अर्थातच तिला मैथूसोबत कार्यक्रमाला जायचं होत. ताईनेही काहीही न बोलता तो निर्णय मान्य केला. मैथूलाही आधी आईने आपल्याबरोबर कार्यक्रमाला यायला प्राधान्य दिलं, याचा आनंदच झाला. पण नंतर तिने याचा नीट विचार केला. ताईचा मित्र कशाकरता येणार होता हे मैथूला चांगलंच माहित होतं आणि ताईच्या मनात काय आहे हे ही ती जाणून होती. शिवाय ताई अशा गोष्टी पटकन बोलणार्यातली नव्हती, त्याअर्थी तो प्रस्ताव त्यानेच मांडला असणार हे ही उघडच होतं.
कधीही पटकन व्यक्त न होणाऱ्या ताईला वाईट तर नक्कीच वाटलं असणार पण तिने तसं अजिबात जाणवू दिलं नाही. शेवटी न रहावून मैथूनेच आईला घरी रहायला सांगितलं. "अगं तो पहिल्यांदा घरी येतोय तर थांब ना" इति मैथिली. तिला असं वाटलं कि आई समजून घेईल... पण झालं उलटंच. मैथू असं का सांगत असेल हे समजून घेण्या ऐवजी आई मैथूलाच रागे भरू लागली. तिला वाटलं की मैथूला आपण तिच्याबरोबर यायला नको आहोत म्हणून ती असं सांगते आहे. तेवढ्यात तिने मैथूला "माझ्या पासवर दुसर कोण येणार आहे का?" असेही विचारलं. आईच्या अशा आरोपवजा बोलण्याचे मैथूला फार वाईट वाटलं. आईच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं हेच तिला कळेना.
मैथूला आईला गैरसमज झाल्याच वाईट वाटत नव्हत तर वाईट या गोष्टीचं वाटत होत की आपण असं का सांगत असू हे साधं जाणून घेण्याचाही प्रयत्न आईने केला नव्हता. आईने नुसतं कारण जरी विचारलं असतं ना तरी तिला सगळ नीट समजावून सांगता आलं असतं पण तिने तसं न करता "मैथूला आपल्या पासवर दुसऱ्या कोणाला तरी न्यायचं आहे" असा विचार केला. पण तरीही मैथूने पुढाकार घेऊन आईला परिस्थिती नीट समजावून सांगितली. पण त्यामागे "आपण कसे निर्दोष आहोत" हे सिद्ध करणं नव्हत, तर ताईने जो निर्णय घ्यायचं ठरवलं आहे, तो कितपत बरोबर आहे, तो मुलगा कसा आहे, हे बघावं आणि ताईसाठी योग्य तो निर्णय योग्य वेळी घ्यायला मदत करावी, हीच भावना होती.
कार्यक्रम संपल्यावर मैथिली घरी आली, रात्रीची जेवण सुरु झाली. मैथिलीने नुसता ताईच्या मित्राचा विषय काढला आणि आई भरभरून बोलू लागली. तिला तो खूप आवडला होता. ताईही खूप खूष होती. मैथिली ही आनंदाने सगळ ऐकत होती... पण सकाळी घडलेल्या प्रसंगाबद्दल कुठेतरी तिला वाईट वाटत होतं....
Hmmm samzu shakto aamhi... good... go on... :)
ReplyDelete