मित्र- " ए तू पुढच्या आठवड्यात काय करते आहेस? शुक्रवार, शनिवार, रविवार लागून सुट्टी आली आहे. अजून २ दिवस रजा टाकून कोकणात फिरायला जाउया का?"
सध्या कामातून थोडी विश्रांती मिळाल्यामुळे मीही चटकन होकार दिला. मग कधी निघायचं? कसं जायचं? कुठे कुठे थांबायचं? वगैरे वगैरे ठरवण्यासाठी छोटीशी मिटिंग झाली. मुंबई हून गणपतीपुळे, मग मालवणला जायचं ठरलं. मध्ये एक दिवस मित्राच्या गावीही जायचं ठरलं. सगळा प्लान पेपरवर तयार झाला. गाडी आमचीच असल्यामुळे आणि ती माझा मित्रच चालवणार असल्यामुळे प्रवासाचा त्रास फारच कमी होणार होता.
नाटकांच्या दौऱ्याव्यतिरिक्त कोकणात मी फिरायला अशी पहिल्यांदाच जाणार होते त्यामुळे excitment होती पण मुंबईच्या lifestyle ची सवय झाल्यामुळे आपण तिथे adjust करू शकू की नाही याची काळजीही वाटत होती.
बघता बघता निघायचा दिवस उजाडला. गाडीत Bags कोंबल्या आणि प्रवासाला सुरुवात झाली.गाडीचा वेग वाढू लागला तसं आपण मुंबईच्या गर्दीतून बाहेर पडू लागलो याची जाणीव झाली. खाऊचा साठा तर इतका घेऊन ठेवला होता की पूर्ण ट्रीपची जेवण आणि नाश्ते त्यावर करता येणार होते. त्यामुळे आमचं चरण मध्ये मध्ये चालूच होतं. खादाडी चालू असूनही वडखळ नाक्यावर मिसळ खाण्याचा मोह आवरता आला नाही. भन्नाट टेस्टी होती मिसळ...
छोटी छोटी खेडी जाताना वाटेत लागत होती. मित्र त्या खेड्यांबद्दल त्याला जेवढी माहिती होती ती तो मला मनापासून सांगण्याचा प्रयत्न करत होता. रस्ते वाटले होते तितके वाईट अवस्थेत नव्हते त्यामुळे अंधार पडू लागला होता तरी वळणा वळणाचा तो रस्ता व्यवस्थित दिसत होता. रात्री ९ च्या सुमारास आम्ही आमच्या पहिल्या destination म्हणजे गणपतीपुळ्यात येऊन पोहोचलो. उशीर झाल्यामुळे पटापट सामान रूमवर टाकून जेवायला धावलो. एकंदरीत ट्रीपमध्ये आमच्या खाण्याचा उत्साह दांडगा आहे हे एव्हाना तुमच्या लक्षात आलच असेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता उठून पटापट आवरून गणेश दर्शनासाठी मंदिराकडे जायला निघालो. संकष्टीच्या दिवशी गणपतीच दर्शन होणार होतं, यामुळे आनंद द्विगुणीत झाला होता.सकाळी लवकर गेल्यामुळे फार गर्दी नव्हती. त्यामुळे अगदी छान मनसोक्त दर्शन घेता आलं. नंतर बीचवर गेलो. खरतर मुंबईकरांना बीचच तितकस आकर्षण नसत असं म्हणतात, पण हा बीच इतका सुंदर आणि स्वच्छ आहे कि आम्ही अधाशासारखे त्याचे फोटो काढू लागलो. उंटावरून एक फेरफटका हि मारण्यात आला. जास्त वेळ थांबता आलं नाही कारण वेळ थोडा आणि खूप फिरायचं होत.
मग वैभववाडीला माझ्या आत्याकडे जायला निघालो. पोहोचायला थोडा उशीरच झाला कारण फोटो काढण्यासाठी मध्ये मध्ये गाडी थांबत होती. इथली मंडळी जणू चातक पक्ष्यासारखी आमची वाट पाहत होती. आम्ही पोहोचल्यावर आमचे किती लाड करू आणि किती नको असं झालं होत. मुंबईतली मंडळी इतक्या लांब फार जात नाहीत, त्यामुळे आमचा पाहुणचार काही औरच होता. आम्ही पण लगेच रुळलो. उन्हातून दमून आल्यामुळे लगेच सरबत झाली. मग जरा गप्पा टप्पा झाल्या. संकष्टी असल्यामुळे छान गोडाचं जेवण होत. वाढण्यात आग्रह होता, तो ही तोंड देखल्या नव्हे तर मनापासून. जेवण आटपतायत न आटपतायत तोपर्यंत पुढ्यात दारातल्या केळ्यांचे घड आणि कलिंगड ठेवण्यात आलं. बर आग्रह एवढा की नाही म्हणवेना. मग आत्याने तिची बाग दाखवली.इतकी फळझाड मी एकत्र कधीच पाहिली नव्हती. काजू, पेरू, चिकू, फणस, करवंद, केळी... आणि आंबे तर सहज हाताला लागतील इतक्या खाली लटकत होते. बागेच्या कडेकडेने वेगवेळ्या फुलांची झाडे आणि त्यांची सुंदर अशी रचना केळी होती. तासभर कसा निघून गेला ते कळलच नाही.
मग आमची गाडी मित्राच्या गावाकडे वळली. जाताना एवढी माडाची झाडं, नद्यांचे प्रवाह लागले की इथल्या इमारतींचा आणि दगदगीच्या आयुष्याचा काही काल विसरच पडला. बघता बघता आम्ही मित्राच्या गावाला येऊन पोहोचलो. आपण चित्रात काढतो तशी कोनाच छत असलेली कौलारू घर तिथे होती. एकदम आपण लहानपणी काढलेल्या एखाद्या चित्रात प्रवेश केल्यासारखं वाटत होत. आम्ही तशाच एका घरात शिरलो. ते माझ्या मित्राच्या काकाचं होत. तिथे गेल्यावरही पुन्हा त्याच प्रेमाची आणि आपुलकीची जाणीव झाली हे वेगळ सांगायला नको. गेल्या गेल्या चहा समोर आला. मी चहा घेत नाही हे कळल्यावर लगेच माझ्यासाठी दुध साखर आणण्यात आलं. पूर्ण घर शेणाने सारवल होत, अंगणात झोपाळा होता, माणसांबरोबर मांजरी आणि कोंबड्यांचा ही वावर होता... इतकं प्रसन्न वातावरण होत की खरच ते वातावरण अनुभवायला दरवर्षी मी गावी जायचं मनात पक्क करून टाकलं. मी मुद्दाम स्वयंपाक खोलीत गेले. तिथे बायकांच काम चुलीवर चाललं होत. आपण जसा gas कमी जास्त करतो तशा त्या चुलीतली लाकड कमी जास्त करून, मध्ये मध्ये नळीतून फुंकर मारून आच कमी जास्त करत होत्या. मला खूपच मज्जा येत होती. एक दिवस आम्ही तिथेच राहिलो.
सकाळीच मंडळींचा निरोप घेऊन आम्ही मालवणला जायला निघालो. रस्ता घाटा घाटाचा असल्या कारणाने सगळ्यांचे डोळे रस्त्यावर टिकून होते. एका बाजूला लाल मातीचे डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. आजूबाजूला छान हिरवळ पसरली होती. मला वाटत मुंबईकरांना पालेभाजीच्या पलीकडे फारशी हिरवळ पाहायलाच मिळत नाही. हवेत जरा दमटपणा आल्यावर मालवण जवळ जवळ येत असल्याची जाणीव झाली.
वेळ कमी असल्यामुळे मालवणला पोहोचल्यावर लगेचच गाडी पार्किंगमध्ये लावली आणि किल्ला पहायला पळालो. किल्यातील बांधकाम जून झाल्यामुळे जीर्ण झालं होत. पण जे बांधकाम पाहिलं आणि गाईडने जी माहिती पुरवली त्यातून याच मोठ कौतुक वाटलं. समुद्राच्या मधोमध असलेल्या या किल्यात ३ गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत, शत्रूला न दिसता टेहाळणी करण्याची उत्तम सोय, सहजा सहजी चढता येऊ नये म्हणून केलेली मोठ्या मोठ्या पायऱ्या... पूर्ण इतिहास आठवला. महाराजांना पुन्हा एकदा वंदन करून त्याच समुद्रात स्नोर्क्लिंग करायला निघालो. यात पाण्यात घेऊन जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि वनस्पती दाखवले जातात. आपण बुडू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जाते. इतक्या जवळून वेगवेगळ्या प्रकारचे आणि रंगाचे मासे पहायला मिळतात जर हात पुढे केला तर त्यांना सहज पकडता येईल. खूप खूप धमाल आली. पाण्याखालच एक वेगळ जग पहायला मिळाल.
कसे ३ दिवस निघून गेले ते कळलच नाही. परतीच्या वाटेला लागलो, पण थोडा वेळ अजून असायला हवा होता असं सारख सारख वाटत होत. त्या आठवणी मनात ठेऊन परत निघालो.
पण आता जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा कोकणात जाणार हे नक्की....
- मानसी कुलकर्णी.