हल्लीच पुन्हा पेट्रोलचे भाव भडकले. थोडी थोडकी नाही तर ५ रुपयांची भाव वाढ झाली, आता लवकरच डिझेल, LPG / CNG गॅसचे भाव वाढणार. मग पुन्हा रिक्षा आणि टॅक्सी यूनियन वाले आणि त्यांचे नेते संप पुकारणार. सरकार नेहमी प्रमाणे नमत घेणार आणि पुन्हा आपण भाववाढीला सामोरे जाणार.
पण ज्या वेळेस, दिवसात कोणत्याही वेळेस आपल्याला रिक्षा, टॅक्सी मिळत नाही, हे उद्दाम ड्राइवर्स सर्रास "नाही जाणार" असं सांगतात, गॅस संपलाय, रिक्षा बंद आहे, अस सांगून आपल्याच डोळ्यासमोर त्यांना ह्व आहे तिथे, दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जातात. तेव्हा ही नेते मंडळी असतात कुठे.
त्यांना त्यानी केलेल्या कामाचे योग्य पैसे मिळायलाच हवेत, यात दुमत नाही, पण त्यांनीही त्याचं काम प्रामाणिक पणे करायला हवं.
दुसर उदाहरण द्यायचं झाल तर आपले "बेस्ट" बसवाले. सकाळी ऑफिसला जाणारी माणसं, संध्याकाळी दमून भागून घरी येणारी माणसं समोरून धावत येताना दिसत असून सुद्धा आणि बस मध्ये जागा असून सुद्धा सरळ बसचा वेग वाढवून निघून जातात. एकीकडे "बेस्ट" बसचा जास्तीत जास्त वापर करा अशी जाहिरात केली जाते आणि दुसरीकडे मात्र याच्या विरुध्द पद्धतीने वागलं जातंय, हे खरच बरोबर आहे का?
मोठ मोठ्या खाजगी कंपन्या ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देत असताना, ही महत्वाची यंत्रणा वर्षानुवर्षे त्याच पद्धतीने चालू आहे... किती काळ टिकू शकेल हे सगळ.
भविष्यात जर कोणत्यातरी खाजगी कंपनीने टॅक्सी, बस आणि रिक्षा सुरू केली आणि उत्तम सेवा देऊ केली ( मेरू आणि कूल टॅक्सी यांनी आपल्या उत्तम सेवेमुळे आपल अस्तित्व व्यवस्थित सिद्ध केलंय) आणि आपण सगळ्यांनी त्या सेवेचाच वापर सुरू केला, तर ह्या एवढ्या मोठ्या कम्यूनिटीच काय होणार? मग पुन्हा संप, आंदोलंनाना सुरूवात होणार... यात पुन्हा आपलीच गळचेपी... हे सगळ होण्यापेक्षा आताच त्यानी नीट कामाला लागायला नको का? कामगार नेत्यांनी तरी त्याना योग्य ते प्रशिक्षण, मार्गदर्शन करायला नको का? फक्त रिक्षा आणि टॅक्सीचे भाव वाढवण्या इतपत त्यांची भूमिका मर्यादित का?
वेळेत बदल घडवून कामाला सुरुवात केली तर भविष्य उज्ज्वल आहे... नाहीतर...
- मानसी कुलकर्णी.