काही महिन्यापूर्वी "आदर्श" हा शब्द वाचला/ ऐकला की थोर व्यक्ती, संघटना आणि त्यांची उत्तमोत्तम कामं डोळ्यासमोर यायची. त्यांचे थोर विचार लक्षात यायचे आणि समाजाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आणि समाजाच्या कल्याणासाठी त्यांची धडपड जाणवायची.
याच नावाने एक बिल्डींग मुंबईत बांधली गेली. जो उद्देश ही सोसायटी बनवताना होता तो खरच आदर्श या शब्दाला साजेसा होता. पण पुढे त्याच काय झाल ही लिहिण्यात मी वेळ फुकट घालवणार नाही. ते जग जाहीर आहे आणि रोज वृत्तपत्र चाळली की ह्या विषयी काही ना काही तरी लिहून येतंच आहे.
हा घोटाळा खरच फार भीषण आहे."एक "आदर्श" घोटाळा उघडकीस..." ही 'ब्रेकिंग न्युज" वृत्तपत्र आणि वाहिन्यांवर पाहून खूप वाईट वाटलं. आदर्श हा शब्द या वाक्यातही वापरला जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हत.
माझ्या पर्यंतच्या पिढीला "आदर्श" म्हटलं तर किमान काही थोर व्यक्ती/ संघटना आणि त्यांची कामं तरी आठवतात, पण माझा माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असलेला माझा भाचा किवा त्याची पिढी "आदर्श" म्हटलं की "घोटाळा ना" असं सहज म्हणून जाते. किती हा अपमान या शब्दाचा.
पुढे जाऊन विचार करायचं झाल तर ती इमारत आता पाडून टाका यावर वाद विवाद सुरु आहेत. पण खरच ती इमारत पाडून ह्या ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत, त्याची उत्तरं सापडतील का? तर माझं उत्तर "नाही" असच आहे. म्हणजे जे कोणी भ्रष्ट नेते, अधिकारी किवा सोसायटीतील सदस्य या घोटाळ्यात सामील आहेत त्यांना कडक शासन झालंच पाहिजे, पण ती इमारत पाडून टाकण, हा मार्ग मला तरी योग्य वाटत नाही.
म्हणजे या इमारतीच जे काही बांधकाम कायद्याला वाकवून किवा तोडून झाल आहे, ते नक्कीच तोडलं गेलं पाहिजे, पण जे कायद्यात बसत ते न पाडता त्याचा योग्य तो वापर झाला पाहिजे.
उदाहरणार्थ: हल्ली मराठी शाळांचं प्रमाण कमी झाल आहे, तर एक "आदर्श" मराठी शाळा तिथे उभी राहू शकते. एखाद उत्तम संग्रहालय, लहान मुलांसाठी "वर्कशोप प्लेस" तयार करता येऊ शकते. एखाद अनाथाश्रम किवा वृद्धाश्रम तिथे निर्माण करता येऊ शकेल. कितीतरी उत्तमोत्तम प्रकल्प जागे/ निधी अभावी आकारास येऊ शकत नाही आहेत, तर या इमारतीचा योग्य तो वापर करून ते प्रकल्प सुरु करता येऊ शकतील. आणि हल्ली जो लोकांनी "आदर्श" म्हणजे घोटाळा हा अर्थ काढला आहे, तो सकारात्मक दृष्टीने "आदर्श" बनवता येईल.
आता एवढ तरी करायला हवंच ना!!
- मानसी कुलकर्णी